जैतापूर/राजन लाड: राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गावरील दळे, कुवेशी, वाघ्रण परिसरातील नागरिक आणि प्रवाशांना दिलासा देणारा उपक्रम महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व कट्टर राणे समर्थक जब्बार काझी यांनी राबवला आहे. प्रवासी थांबा नसलेल्या विविध एसटी स्टॉपवर त्यांनी स्वखर्चाने तब्बल १४ ते १५ सिमेंट बेंचेस बसवून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
या बेंचेस जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, होळी स्टॉप, दळे स्टॉप, कुवेशी स्टॉप, वाघ्रण स्टॉप, तसेच तुळसूंदे येथील स्मशानभूमी परिसरात बसवण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे दळे आणि परिसरातील नागरिक, रुग्ण, शालेय विद्यार्थी तसेच प्रवासी यांना मोठ्या प्रमाणात सोय झाली आहे.
यापूर्वीही गणेशोत्सव काळात दळे गावातील रस्त्यांवरील वाढलेले गवत साफ करून त्यांनी ग्रामस्वच्छतेस हातभार लावला होता. तसेच परिसरात घडणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, आपत्कालीन प्रसंग किंवा गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी ते सदैव पुढे असतात.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत “जब्बार काझी हे केवळ कट्टर राणे समर्थकच नव्हे, तर जनतेचे कार्यकर्ते आहेत” असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे सामाजिक जाणीव आणि लोकसेवेबद्दल आदर्श निर्माण झाला आहे.
“स्वतःच्या खर्चाने लोकांच्या सोयीसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळावी, हीच माझी अपेक्षा आहे,” असे जब्बार काझी यांनी सांगितले.
दळे परिसरातील रहिवासी तसेच प्रवाशांकडून या उपक्रमाचे मनापासून स्वागत करण्यात येत आहे.