साखरपा (प्रतिनिधी):साखरपा पंचक्रोशीतील ति.कुणबी समाजाच्या वतीने समाजातील १७ गावांमधील इ. १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात एकूण १२० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला असून, त्यांना प्रेरणा देण्यासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सीताराम अर्जुन जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक विष्णूशेठ रामणे, ऍड. संदीप ढवळ, उद्योजक शंकरशेठ नवाले, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य विजय बाईंग, भडकंबा सरपंच सौ. कटम, ओझरे सरपंच आदी मान्यवरांची उपस्थिती होती. ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमात प्रा. डॉ. सदानंद आग्रे यांनी “व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान जागृत केले. मोबाईलचा वापर, आदर्श संस्कार आणि पालकांची जबाबदारी या बाबींवर त्यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत भाष्य केले. त्यांच्या विचारांनी विद्यार्थी आणि पालक दोघांनाही अंतर्मुख होण्यास भाग पाडले.
यावेळी प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणारा क्षितिज महेश कांबळे आणि कोकण रेल्वेच्या सेवेत विभागीय अभियंता म्हणून निवड झालेल्या कौशल रामचंद्र घाणेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात अमोलशेठ लाड, संदीप ढवळ व विष्णूशेठ रामणे यांनी ग्रामीण भागातून शहरांकडे होत असलेल्या स्थलांतराबाबत चिंता व्यक्त केली. समाजातील अनेक दानशूर व्यक्ती आर्थिक सहकार्यासाठी तयार असून, युवकांनी पुढे येण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोलशेठ लाड, रमेश ढवळ, बापू ढवळ, सुनील शिवगण, दीपक गोवरे, रामचंद्र घाणेकर, शांताराम जाधव, पेंटर ढोके, यशवंत घागरे, प्रमोद जायगडे, रविंद्र जायगडे, संजय बाईंग, विजय बाईंग सर, भाऊ बाईंग यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन यशवंत घागरे यांनी तर प्रास्ताविक प्रमोद जायगडे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप बापू ढवळ यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.
ति.कुणबी समाज साखरपा पंचक्रोशीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Leave a Comment