पुणे: दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात वारीतील वारकऱ्यांना लुटून 17 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आले होते. या घटनेतील दोन संशयित आरोपींना अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर उर्फ लकी पठाण आणि विकास सातपुते अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना रांजणगाव येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर उर्फ लकी पठाण हा माळशिरस तालुक्यातील आहे. तर विकास सातपुते हा इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील आहे. रांजणगाव येथे आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जारी केले. फुटेजमध्ये पोलीस हॉटेलमध्ये घुसून आरोपींना ताब्यात घेताना दिसत आहेत. आरोपी रांजणगाव येथे थांबले असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार आम्ही कारवाई केली, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, ३० जून रोजी वारकऱ्यांची गाडी पंढरपूरच्या दिशेने जात होती. तेव्हा ते स्वामी चिंचोलीच्या एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले. गाडीमध्ये महिला, पुरुष आणि तरुण मुली होत्या. त्याचवेळी दोन लोक दुचाकीवरून आले आणि त्यांनी कोयत्याचा धाक दाखवत महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले. तसंच आरोपींनी एका अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार केला.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. गावकऱ्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. आता आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस पुढील तपास करत आहेत.
वारीला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक
