मुंबई: हिंदी सक्तीच्या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर सरकारनं हा निर्णय रद्द केला. या विरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. पण निर्णय रद्द झाल्यानंतर मोर्चाऐवजी विजयी मेळावा होत आहे.
वरळी येथे या मेळाव्याला सुरुवात झाली. त्यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल पण राज आणि उद्धव ठाकरे यासाठी एकाच जागी आले.
यापूर्वी मोर्चाचा निर्णय झाला तेव्हा संजय राऊत यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत एक फेसबूक पोस्ट केली होती.
या मेळाव्यामध्ये राज किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून दोन्ही पक्षांच्या युतीबाबत काही संकेत मिळणार का? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
मराठी हाच झेंडा- राज ठाकरे
या मेळाव्यात बोलताना सन्माननीय उद्धव ठाकरे आणि जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो अशी सुरुवात राज ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, “खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं चित्र मोठ्याप्रमाणावर उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. आजचा मेळावा शिवतीर्थवर व्हायला पाहिजे होता. पण पाऊस आहे. बाहेर उभं आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त करतो.”
“मी माझ्या मुलाखतीत म्हटल्यानंतर सर्व गोष्टी सुरू झाल्या. कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. 20 वर्षांनी आम्ही एकत्र येतोय. जे बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही. ते देवेंद्र फडणवीसांना जमलं.”
“कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही”
ते पुढं म्हणाले, “हिंदीचं अचानक कुठून आलं कळलं नाही मला. हिंदी कशासाठी. कोणासाठी हिंदी. त्या लहान मुलांवर जबरदस्ती करताय तुम्ही. शिक्षणतज्ञ्जांना विचारायचं नाही. सत्ता आहे लादणार. तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर.”
“नंतर शिक्षणमंत्री दादा भुसे माझ्याकडे आहे. मला म्हणाले की, आम्ही काय म्हणतोय समजून तर घ्या, तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईल पण ऐकणार नाही म्हटलं.”
“हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट जा सगळीकडे इंग्रजीत गोष्टी होतात. तिकडे कुठे आहे त्रिभाषा सूत्र. इतर राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला. दक्षिणेतले राज्य विचारत नाही ह्यांना.
“महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय होतं हे पाहिलं त्यांनी म्हणून तर माघार घेतली त्यांनी. हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास. हिंदी भाषिक नाहीत ते आर्थिकदृष्ट्या प्रगत. कोणासाठी हिंदी शिकायचं. पाचवीनंतर हिंदी चित्रपट सृष्टीत जायचंय का? कोणतीही भाषा उत्तमच आहे. प्रत्येक भाषा मोठी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात.”
आम्ही मराठी लादली का?- राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले, “हिंदी प्रातांवरती 125 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. इतक्या प्रदेशांवरती राज्य केलं. आम्ही मराठी लादली का? हिंदी भाषा 200 वर्षांपूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळातही नव्हती. ह्यांनी फक्त चाचपडून पाहिलं आहे. मुंबई स्वतंत्र करता येते का यासाठी भाषेला डिवचून पाहिलं. कोणी महाराष्ट्राला हात लावून दाखवावा. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत. लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले. त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?”
संकेत की संदेश?
“महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगितलं. याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही तपासून पाहत आहोत. मी तुम्हाला फक्त संदेश नाही, तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात काहीही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश वगैरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ.”
उद्धव ठाकरेंनी हे सूचक वक्तव्य राज ठाकरेंच्या मनसे पक्षासोबतच्या युतीबद्दल केलं होतं. अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं बोललं जातं. तशा चर्चाही रंगतात.
गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हे दोन्ही भाऊ एकत्र येतील या चर्चांनी जोर धरला आहे.
कारण, दुसरं तिसरं कोणी नाही, तर थेट राज आणि उद्धव या दोन्ही भावांनी तसे संकेत दिले आहेत.
त्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मोर्चाची घोषणा केली आणि सगळ्यांनी पक्षांचा झेंडा बाजुला ठेवून सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्याला उद्धव ठाकरे गटाकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.
संजय राऊत यांनी पोस्ट करून दोघं भाऊ मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र येणार असं स्पष्ट केलं होतं.
पण सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर मोर्चाही रद्द झाला. पण सरकारला माघार घ्यावी लागल्याने राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे विजयी मेळावा घेण्याचा निर्णय घेतला.
‘आम्हाला एकत्र करण्यासाठी जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं’- राज ठाकरे

Leave a Comment