मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा पावसाची सक्रियता वाढली आहे. हवामान विभागाने कोकण, विदर्भ आणि घाटमाथा भागात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या दरम्यान कोकणातील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. काही भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे.
१४ व १५ ऑगस्ट रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर कायम राहील. तर १६ ऑगस्टला दक्षिण कोकण-गोवा, उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह पुण्यातही १५ व १६ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार आहे.
हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र या आठवड्यात तेलंगणाहून महाराष्ट्राकडे सरकणार आहे. त्याचा परिणाम म्हणून पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १३ ते २० ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. लातूर, नांदेड, सोलापूर आणि संभाजीनगर जिल्ह्यांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी या काळात शक्यतो बाहेर पडणे टाळावे, नदी-नाल्यांच्या काठावर जाण्याचे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
राज्यात आठवडाभर मुसळधार पावसाचा इशारा
