GRAMIN SEARCH BANNER

जनक जागुष्टे यांच्या दातृत्वातून रेवाळेवाडीत गणेश विसर्जन तलाव साकार; ग्रामस्थांची अनेक वर्षांची पायपीट थांबली

Gramin Varta
158 Views

संगमेश्वर: तळेकांटे रेवाळेवाडी येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गणेश विसर्जन तलावाचा प्रश्न ग्रामस्थांची एकजूट आणि ओझरे गावचे सुप्रसिद्ध समाजसेवक जनक जागुष्टे यांच्या दातृत्वामुळे अखेर निकाली निघाला आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी बावनदीवर करावी लागणारी पायपीट आणि त्या ठिकाणची अरुंद पायवाट आता इतिहासजमा झाली असून, गावाजवळच हक्काचा तलाव उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संगमेश्वर तालुक्यातील रेवाळेवाडी येथील ग्रामस्थांना गणेश विसर्जनासाठी दरवर्षी मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत असे. गावच्या वस्तीपासून बावनदीचे अंतर जास्त असल्याने आणि तिथपर्यंत पोहोचणारी वाट अत्यंत अरुंद असल्याने ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना विसर्जन सोहळ्याला उपस्थित राहता येत नव्हते. ही समस्या सोडवण्यासाठी शासकीय निधीची वाट न पाहता समाजसेवक जनक जागुष्टे यांनी स्वखर्चातून संपूर्ण तलावाचा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. जागुष्टे साहेबांनी कोणत्याही मदतीची अपेक्षा न ठेवता आपल्या दातृत्वाचा परिचय देत हा तलाव साकारून दिला आहे.

या प्रकल्पामुळे आता प्रत्येक ग्रामस्थाला भक्तीभावाने विसर्जन सोहळा जवळून पाहता येणार आहे. या मोलाच्या सहकार्याबद्दल समस्त रेवाळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने जनक जागुष्टे यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत. तळेकांटे गावचे उपसरपंच राजू येद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या कामासाठी ग्रामस्थांनीही एकजूट दाखवली. या यशस्वी उपक्रमाबद्दल बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की, गावची एकजूट आणि जागुष्टे साहेबांचे सहकार्य रेवाळेवाडीच्या इतिहासात कायमस्वरूपी लक्षात राहील. हा तलाव साकारण्यासाठी तुकाराम रेवाळे, काशीनाथ रेवाळे, सचिन रेवाळे, सुधीर भाऊ रेवाळे, गावकर सुरेश रेवाळे, शांताराम रेवाळे यांसह गावातील अन्य ग्रामस्थ आणि महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले. समाजहित जोपासणाऱ्या अशा उपक्रमांमुळे रेवाळेवाडीच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून, या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3225175
Share This Article