GRAMIN SEARCH BANNER

मालगुंड संस्थेच्या डॉ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

Gramin Varta
5 Views

तरवळ/ अमित जाधव: रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे कै. डॉ.दिलीप मुरारीउर्फ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली ता . गुहागर  येथे सोमवार दिनांक २८ जुलै रोजी मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे सल्लागार मंडळाचे सदस्य तसेच माजी शिक्षक उमेश अपराध (कोल्हापुर )यांनी त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे माजी अध्यक्ष कै. डॉ. दिलीप मुरारी उर्फ नानासाहेब मयेकर यांच्या नावे गुहागर तालुक्यातील कजुर्ली या ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यात आली आहे. परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, कोणत्याही प्रकारचे अनुदान या शाळेला शासनाकडून मिळत नाही आणि त्यामुळे अनेक दानशूर व्यक्ती या शाळेला वेळोवेळी मदत करतात. त्यातच उमेश अपराध हे कोल्हापुर या ठिकाणी वास्तव्यास असतात काहीकाळ त्यांनी मालगुंड प्रशालेमध्ये शिक्षक म्हणून काम केले आहे. नंतर ते कोल्हापुर येथे स्थायिक झाले. पण इथल्या मातीशी त्यांची कायमच आपुलकी आहे. आणि त्यामुळे त्यांचे आणि डॉ नानासाहेब मयेकर यांचे मैत्रीचे संबंध आणि त्यांच्या वरील प्रेमापोटी  त्यांच्या नावाने सुरू असलेल्या शाळेला ते दरवर्षी मदत करतात.

उमेश अपराध हे दरवर्षी या शाळेला आपल्या कोल्हापुर येथील मित्र मंडळाच्या मार्फत मदत करतात. या वर्षी सुमारे ३० डजण वह्या इथल्या विद्यार्थ्यांना दिल्या. तसेच अन्य शैक्षणिक साहित्य सुद्धा वितरीत केले. त्याच बरोबर गतवर्षी इयत्ता दहावी मध्ये प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना देखील आर्थिक व शैक्षणिक मदत केली.गेल्यावर्षी ही यांच्या मार्फत या विद्यार्थ्यांना १० सायकली देण्यात आल्या होत्या.

या कार्यक्रमाला मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर सचिव विनायक राऊत सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, संचालक रोहित मयेकर, परेश हळदणकर, नंदकुमार डिंगणकर, आर जी कुलकर्णी ( प्राचार्य कोल्हापुर), उज्ज्वल मुजुमदार, रविंद्र पोर्लेकर, सुनिल बेळेकर, प्रकाश वांजोळे, जाकादेवी प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे, हनुमंत कदम, कजुर्ली गावच्या पोलीस पाटील सीमा लिंगायत, सरपंच मेघना मोहिते, मुलू सुवरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास साळवी, आबा खानविलकर, प्रशालेचे मुख्याध्यापक आशिष घाग तसेच सर्व शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.

उमेश अपराध आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याबद्दल मालगुंड एज्युकेशन सोसायटी तसेच डॉ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

Total Visitor Counter

2647148
Share This Article