संगमेश्वर, (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायतीच्या नवीन तंटामुक्त अध्यक्षपदी इरफान नेवरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल गावातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
गावातील वादविवाद आणि छोटे-मोठे तंटे सामंजस्याने सोडवून गावात शांतता व सलोखा राखण्यासाठी तंटामुक्त समितीची स्थापना करण्यात येते. या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा आता इरफान नेवरेकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांची निवड सर्वानुमते आणि कोणतीही निवडणूक न होता बिनविरोध झाल्याने गावातील एकोप्याचे उत्तम उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
यावेळी झालेल्या बैठकीला कुरधुंडा गावच्या सरपंच नाझिमा बांगी, उपसरपंच तैमूर अल्जी, माजी सरपंच जमुरतभाई अल्जी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी आणि शांततेसाठी इरफान नेवरेकर हे उत्तम काम करतील, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
इरफान नेवरेकर यांनीही निवडीनंतर बोलताना, गावातील लोकांच्या सहकार्याने आणि विश्वासाने तंटामुक्त गाव मोहीम यशस्वी करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, कोणत्याही प्रकारचा वाद मिटवण्यासाठी ग्रामस्थांनी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.