मुंबई: देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतली असली, तरी आता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 22 ऑक्टोबरपासून पुढील चार दिवस राज्यभरात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत आधीच महाराष्ट्राने अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीचा मोठा फटका सोसला आहे. अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले, जनावरे दगावली, घरे पाण्याखाली गेली आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले. नुकत्याच झालेल्या या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पुन्हा एकदा पावसाचा इशारा मिळाल्याने नागरिक चिंतेत आणि वैतागलेले दिसत आहेत.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात सक्रीय झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा विभागाने दिला आहे.
22 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
23 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
24 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या विस्तृत भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर 25 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. पावसासोबतच वादळी वारे, वीज पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिवाळीचा असल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांची हालचाल मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र या नव्या पावसाच्या अंदाजामुळे सणासुदीच्या वातावरणावर सावट पसरले आहे. दरम्यान, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनानेही आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या असून, आवश्यकतेनुसार मदत कार्य तत्काळ सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परीक्षा पाहिली जात असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
राज्यभरात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
