GRAMIN SEARCH BANNER

स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये चिपळूण नगर परिषद कोकणात अव्वल

राज्यात १४ वा, देशात ८७ वा क्रमांक

चिपळूण : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये चिपळूण नगर परिषदेने उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्रात १४ वा आणि कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. देशभरातील ४५८९ शहरांच्या स्पर्धेत, ५० हजार ते ३ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात चिपळूणने देशात ८७ वा क्रमांक पटकावला आहे.

चिपळूण नगर परिषदेमार्फत नियमितपणे १०० टक्के कचरा संकलन, ओला-सुका आणि घरगुती घातक कचऱ्याचे वर्गीकरण, त्यावर प्रक्रिया, मैला व्यवस्थापन, शौचालयांची स्वच्छता, आणि शहरातील सफाई या सर्व क्षेत्रांत सातत्यपूर्ण काम करण्यात आले.
याशिवाय नागरिक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. केंद्र सरकारच्या अधिकृत संस्थेमार्फत थेट पाहणी आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया यांवर आधारित मूल्यांकन झाले.

या यशामुळे ‘कचरा मुक्त शहर’ (1-Star) व ‘हागणदारी मुक्त शहर’ (ODF++) अशी दुहेरी मान्यता चिपळूण शहराला प्राप्त झाली आहे. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि सहकार्य हा यशामागचा मुख्य आधार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

या यशाचे श्रेय प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. विशाल भोसले यांच्या प्रभावी नेतृत्वास दिले जात असून, त्यांच्या समवेत प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य प्रमुख वैभव निवाते, निरीक्षक सुजित जाधव, शहर समन्वयक पूजा शिंत्रे, तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी, मुकादम, स्वच्छतादूत आणि घनकचरा व्यवस्थापनातील सर्व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मुख्याधिकारी विशाल भोसले म्हणाले, “हे यश संपूर्ण चिपळूण शहराचे आहे. पुढील सर्वेक्षणासाठी नवकल्पनांवर आधारित मोहिमा राबवणार असून, नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्य आणि देशपातळीवर चिपळूणचे नाव अधिक उजळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

स्वच्छतेकडे वाटचाल करत असलेल्या चिपळूण शहराचा हा प्रवास संपूर्ण कोकणासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Total Visitor Counter

2455442
Share This Article