GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : ओणी येथील अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा

Gramin Varta
260 Views

राजापूर : तालुक्यातील ओणी येथील गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ सोमवारी (दि. २०/१०/२०२५) रात्री ८.०० वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात कोदवली येथील ४८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. संजय पुनाजी मांडवे (वय ४८, रा. कोदवली, मांडवेवाडी, ता. राजापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संजय मांडवे हे त्यांची होडा शाईन कंपनीची मोटारसायकल (क्र. एम.एच.०१ ए.डब्ल्यू २८३०) घेऊन ओणी ते कोदवली असा प्रवास करत होते. महामार्गावरील रस्ता सरळ असतानाही आरोपी असलेल्या संजय मांडवे यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत, हयगयीने आणि भरधाव वेगाने बेदरकारपणे दुचाकी चालवली. त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात संजय मांडवे यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी विजय पुनाजी मांडवे (वय ५२, रा. कोदवली, मांडवेवाडी, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार, पोलिसांनी मयत संजय मांडवे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(अ), (ब), २८१ आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १९७/२०२५ अशी करण्यात आली आहे.

संजय मांडवे यांच्या अपघातामुळे झालेल्या मृत्यूची नोंद मंगळवार दि. २१/१०/२०२५ रोजी ००.४९ वाजता करण्यात आली असून, या घटनेमुळे कोदवली आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महामार्गावर निष्काळजीपणे आणि अतिवेगाने वाहन चालवल्यास त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे हे ताजे उदाहरण आहे. पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

2683538
Share This Article