रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे एमआयडीसी परिसरातील ई-६९ या प्लॉटवर चालू असलेल्या देहविक्रीच्या धंद्याचा गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. गुरुवारी सकाळी छापेमारी करून पोलिसांनी नेपाळी महिलेसह दोन ग्राहकांना पकडले. या महिलेला शनिवारी न्यायालयात हजर केले असता तिच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली.
पोलिस तपासानुसार, ही महिला १५ सप्टेंबरला पुण्यातून दोन महिलांना घेऊन आली होती. तीन दिवसांत दोन ग्राहकांशी व्यवहार झाला असून प्रत्येकाकडून सुमारे अडीच हजार रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील प्रत्येकी एक हजार रुपये संशयित महिलेला दिले गेले होते, उर्वरित रक्कमेबाबत चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या प्लॉटचा मालक सुनील कुमार गणपत प्रभू यांना देखील शुक्रवारी सायंकाळी अटक करून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संबंधित ठिकाण १९९१ साली औद्योगिक वापरासाठी विक्री करण्यात आले होते. मात्र येथे अवैध देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांचा तपास अहवाल आल्यानंतर महामंडळाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरी एमआयडीसी वेश्या व्यवसाय प्रकरणी प्लॉट मालकासह नेपाळी महिलेला पोलीस कोठडी
