GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गावर भोके आंबेकरवाडी तिठ्यासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत लांजा येथील वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
231 Views

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा ते निवळी दरम्यान भोके आंबेकरवाडी तिठ्यासमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका ७० वर्षीय पादचारी वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रकाश रघुनाथ पांचाळ (वय ७०, रा. नांदिवली, पोस्ट शिरबवली, ता. लांजा) असे या अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. २० जानेवारी रोजी रात्री ८:३० वाजण्यापूर्वी मयत प्रकाश पांचाळ हे महामार्गावरील रस्ते दुभाजकाच्या पलीकडून निवळी ते हातखंबा अशा दिशेने पायी जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली आणि चालक अपघाताची कोणतीही खबर न देता वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात प्रकाश पांचाळ हे गंभीर जखमी होऊन महामार्गावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच त्यांना नरेंद्र महाराज यांच्या रुग्णवाहिकेने तत्काळ उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, रात्री ९:१० वाजण्याच्या सुमारास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या प्रकरणी हातखंबा तारवेवाडी येथील रहिवासी ओमकित सखाराम तारवे (वय ३३) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ११/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत असून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे.

Total Visitor Counter

3369319
Share This Article