रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती जेटी आणि भाटे समुद्राजवळ समुद्रातील हवामानाची माहिती देणारे ‘वेव्ह रायडर बोया’ हे तरंगते उपकरण काही दिवसांपासून बेपत्ता झाले आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (INCOIS), भू-विज्ञान मंत्रालय, भारत सरकार आणि जी. एम. वेदक महाविद्यालय, तळा-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपकरण बसवण्यात आले होते. त्सुनामी, वादळे, वाऱ्याची दिशा आणि समुद्रातील लाटांची माहिती देऊन मच्छीमार बांधवांना तसेच किनारपट्टीवरील रहिवाशांना संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना देण्यास हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे ठरते.
गेल्या काही दिवसांपासून या ‘वेव्ह रायडर बोया’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यातून माहिती मिळणे बंद झाले आहे, तसेच त्याचे जीपीएस (GPS) देखील बंद आहे. यामुळे ते उपकरण त्याच्या निश्चित ठिकाणाहून वाऱ्याच्या आणि लाटांच्या प्रवाहामुळे इतरत्र वाहून गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समुद्रातील हवामानाचे अचूक अंदाज वर्तवण्यासाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त असल्याने, ते शोधणे महत्त्वाचे आहे. हे उपकरण मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी आणि किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करते.
तरी, हे तरंगते उपकरण कोणालाही आढळल्यास, त्याची माहिती तात्काळ प्रकल्प अधिकारी डॉ. बी. जी. भवरे (मो. ९८२२६२०४२१) किंवा श्री. भरत कुमार (INCOIS मो. ०८१२१३१७१९४) यांच्याशी संपर्क साधून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या उपकरणाच्या शोधात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.