GRAMIN SEARCH BANNER

मुंबईसह कोकणात पुन्हा मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर पावसाचे सावट

कोकण-उत्तर महाराष्ट्रासह राज्यभर यलो अलर्ट

मुंबई: मुंबईसह कोकणात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. चार दिवसांची उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार बॅटिंग सुरू केली असून सकाळपासूनच धो-धो सरी कोसळत आहेत.

त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने आणि दृश्यता कमी झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा पाऊस मुंबईकरांसाठी आणि गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज असून, दक्षिण कोकणात, उत्तर कोकणात म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये मंगळवार आणि बुधवारी ‘यलो ॲलर्ट’ आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २५ ऑगस्ट रोजी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, जळगाव, नाशिक, नंदूरबार तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, बीड, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा धोका असल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

मुंबईत आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला असून घाटकोपर, सायन, चेंबूर, वांद्रे आणि कुर्ला परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली असून सायंकाळच्या सत्रात ही कोंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक सुरळीत असली तरी शहरातील अनेक सखल भागांमध्ये अडचणी निर्माण झाल्या.

मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल रेल्वे सेवाही पावसामुळे विस्कळीत झाली. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण-सीएसएमटी लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत, तर ठाणे-कल्याण मार्गावरील लोकल ५ ते १० मिनिटे उशिराने धावत होत्या. पश्चिम रेल्वेवरील विरार-चर्चगेट गाड्याही उशिराने धावत असून ट्रान्स-हार्बर मार्गावर ५ ते ७ मिनिटांचा विलंब होत होता. भायखळा स्टेशन परिसरात पाण्याची गळती झाल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत होता.

दरम्यान, गणेशोत्सवासाठी गावी परतणाऱ्या चाकरमान्यांची लगबगही पावसामुळे विस्कळीत झाली आहे. कुर्ला एसटी डेपो आणि मुंबईतील इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोकण, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या बसस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. मुसळधार पावसामुळे प्रवासात अडचणी येत असून वेळेत गावी पोहोचण्यासाठी सर्वत्र धावपळ सुरू आहे.

हवामान विभागाने २६ ऑगस्टपासून पावसाचा जोर आणखी वाढेल असा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरातील मॅडन ज्युलियन ऑस्सिलेशन घटकाच्या प्रवेशासोबतच मान्सूनचा आस दक्षिणेकडे सरकलेला आहे. ईशान्य मध्य प्रदेश आणि लगतच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्रही निर्माण झालेले आहे. याचा परिणाम म्हणून कोकण, गोव्यामध्ये 25 ते 30 ऑगस्टदरम्यान, मध्य महाराष्ट्रात 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोव्यात 28 ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पाऊसही पडू शकतो. या कालावधीत गुजरातमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. याचा परिणाम उत्तर मध्य महाराष्ट्रावरही होऊ शकतो.गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरणार आहे.

मुंबईत सध्या काळ्या ढगांनी आकाश व्यापले असून भरदिवस अंधारमय वातावरण निर्माण झाले होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर आला असताना मुसळधार पावसाचे सावट असल्याने उत्सवी तयारीत व्यत्यय येत आहे. शहरातील नागरिक, प्रवासी आणि गणेशभक्तांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

2475258
Share This Article