GRAMIN SEARCH BANNER

महावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे घरगुती ग्राहकांसाठी दिवसा स्वस्त वीजदर

Gramin Varta
207 Views

रत्नागिरी परिमंडलातील ग्राहकांना मिळाली दोन महिन्यात 19 लाख 66 हजारांची सवलत

मीटरचे होणार स्वयंचलित रीडिंग; विजेचा वापरही मोबाईलवर उपलब्ध

रत्नागिरी: महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा दि. 1 जुलैपासून सुरु झाला आहे. या अंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 लाख 83 हजार 737 वीज ग्राहकांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात एकूण 19 लाख 66 हजार इतक्या रुपयांची सवलत मिळाली आहे. महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.

स्मार्ट टीओडी मीटरमुळे जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील 48 हजार 481 ग्राहकांना 3 लाख 20 हजारांची तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 हजार 125 ग्राहकांना 67 हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात वीज ग्राहकांची मिळालेली सवलत वाढली असून रत्नागिरी जिल्ह्यातील 91 हजार 359 ग्राहकांना 11 लाख 81 हजारांची तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 31 हजार 772 ग्राहकांना 03 लाख 97 हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. दोन्ही महिन्यांचा एकत्रित विचार करता रत्नागिरी जिल्ह्यातील 1 लाख 39 हजार 840 ग्राहकांना 15 लाख 01 हजारांची तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 43 हजार 897 ग्राहकांना 04 लाख 65 हजार रुपयांची सवलत मिळाली आहे.

नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरमधून स्वयंचलित मासिक रीडिंग होत असल्याने अचूक बिले मिळतात आणि घरातील विजेचा वापर दर अर्धा तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येते. त्यामुळे वीज वापरावर देखील ग्राहकांचे थेट नियंत्रण राहत आहे. तर सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, इस्त्री, एअर कंडिशनर व जास्त वीज वापर असणाऱ्या इतर उपकरणांचा वापर करू शकतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे.

टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिक ग्राहकानंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडी प्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. सन 2025 ते 2030 या पाच वर्षांसाठी आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत मंजूर केली आहे. यात दि. 1 जुलै 2025 ते मार्च 2026 मध्ये 80 पैसे, सन 2027 मध्ये 85, सन 2028 व 29 मध्ये 90 पैसे तसेच सन 2030 मध्ये 1 रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे.

स्मार्ट टीओडी मीटरचे मासिक रीडिंग स्वयंचलित होणार आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने बिलिंगच्या तक्रारी जवळपास संपुष्टात येणार आहे. तसेच घरात किती वीज वापरली याची माहिती सर्व माहिती संबंधित ग्राहकाच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्राहकांस योग्य वीज वापराचे नियोजन करता येईल. यासह ज्यांच्याकडे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आहे त्यातून वापरलेल्या व शिल्लक राहिलेल्या विजेचा लेखाजोखा ठेवणे हे या स्मार्ट टीओडी मीटरचे प्रमुख फायदे आहे. या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. स्मार्ट टीओडी मीटर हे प्रीपेड नाही तर पोस्टपेड आहे. म्हणजे आधी वीज वापरा मग मासिक बिल भरा अशी सध्याची मासिक बिलिंग पद्धत पुढेही राहणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

2649772
Share This Article