‘मिशन प्रतिसाद’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मोबाईल सेवा सुरू
लांजा : लांजा पोलीस ठाण्याला नुकतीच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी भेट देत, ‘मिशन प्रतिसाद’ या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील पोलीस पाटीलांसमवेत विशेष बैठकीचे आयोजन केले.
या बैठकीत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुरक्षिततेचा अनुभव मिळावा, त्यांना आपत्कालीन परिस्थितीत थेट पोलिसांशी संपर्क करता यावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन प्रतिसाद’ उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. या उपक्रमाअंतर्गत काही निवडक मोबाईल क्रमांक निश्चित करण्यात आले असून, ते क्रमांक पोलीस पाटील आणि उपस्थित नागरिकांना वितरित करण्यात आले.
ही मोबाईल सेवा खासकरून तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असून, त्या माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार, त्रास किंवा आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क साधता येणार आहे. या क्रमांकांचा प्रसार करून ते प्रत्येक गावातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही माईनकर यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाला लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होऊन गाव पातळीवर सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे, असे उपस्थितांनी यावेळी सांगितले.