लांजा: लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात २८ दिवसांच्या एका नवजात मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऋद्राक्षी हरिओम पांडे (वय २८ दिवस) असे या मृत मुलीचे नाव असून, तिला पहाटे कोणताही प्रतिसाद देत नसल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
ही घटना शुक्रवारी (दिनांक ०९/०८/२०२५) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मूळची प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील असलेली ऋद्राक्षी पांडे सध्या तिच्या कुटुंबासह लांजामधील खवडकरवाडी येथे राहत होती. पहाटे ५.३० वाजता ती कोणत्याही प्रकारची हालचाल करत नसल्याचे तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ तिला लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले.
मात्र, तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऋद्राक्षीला मृत घोषित केले. या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ४३/२०२५, बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदन अहवालानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.