जाकादेवी/ वार्ताहर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा (दुर्ग) समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला.ही भारतासाठी आणि विशेषत: महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.या निमित्ताने मालगुंड एज्युकेशन सोसायटीची गुहागर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय काजुर्ली मध्ये यंदाचा दुर्गोत्सव अत्यंत उत्साहाच्या आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची, गड-किल्ल्यांची माहिती व्हावी आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम, साहस व कलात्मकता वाढीस लागावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
शिवकालीन किल्ल्यांची आकर्षक प्रतिकृती यावेळी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची आकर्षक प्रतिकृती साकारली.प्रतापगड,सिंधुदुर्ग,पन्हाळा या किल्ल्याच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी स्वतः माती,दगड,गवत आणि रंग वापरून ही प्रतिकृती तयार केली, ज्यामुळे त्यांना किल्ले बांधणीच्या कलेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
या उपक्रमात शाळेतील इयत्ता आठवी,नववी व दहावीतील 51 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि त्यांच्या कलाकृती पाहून पालक व उपस्थित मान्यवर भारावून गेले. या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.हा दुर्गोत्सव केवळ एक कार्यक्रम नसून, विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक मूल्यांची आणि देशभक्तीची भावना रुजवणारा एक प्रेरणादायी क्षण ठरला.
यावेळी मुख्याध्यापक आशिष घाग,शिक्षिका परवीन तडवी, वर्षा पवार,पल्लवी महाडिक,वैष्णवी पावरी, काजुर्ली शाळा नं १ चे मुख्याध्यापक विजय आखाडे व शिक्षक ज्ञानेश्वर म्हस्के,तसेच निर्मल ग्रामपंचायत काजुर्लीच्या सरपंच मेघना मोहिते,उपसरपंच सुधाकर गोणबरे,ग्रामसेवक अनुज राऊळ, ग्रामपंचायत सदस्य अजित मोहिते,सदस्या सखी सावंत,ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.