GRAMIN SEARCH BANNER

बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांसाठी विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली: बेफिकीरपणे आणि वेगाने वाहन चालवणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना विमा कंपनीकडून भरपाई मिळणार नाही, असा स्पष्ट निकाल न्यायालयाने दिला आहे.

ही सुनावणी एन.एस. रवीश यांच्याशी संबंधित प्रकरणावर होती. १८ जून २०१४ रोजी रवीश हे आपल्या वडील, बहीण आणि मुलांसह कारने प्रवास करत असताना मालनहल्लीजवळ त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रवीश हे वेगात आणि बेपर्वाईने गाडी चालवत होते, त्यामुळे अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी, मुलगा आणि पालकांनी विमा कंपनीकडे ८० लाख रुपयांची भरपाई मागितली होती. मात्र, पोलिसांच्या आरोपपत्रात रवीश यांच्यावर अपघातासाठी थेट जबाबदार ठरवण्यात . यानंतर मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (एमएसीटी) त्यांचा दावा फेटाळून लावला.

पुढे त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अपील दाखल करत अपघात टायर फुटल्यामुळे झाल्याचा दावा केला. परंतु उच्च न्यायालयानेही स्पष्ट केलं की, मृत व्यक्ती निष्काळजीपणामुळेच अपघाताला कारणीभूत ठरली असून विमा कंपनी भरपाई देण्यास बाध्य नाही.

शेवटी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने या प्रकरणाचा पुनर्विचार करत उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. खंडपीठाने म्हटले की, जेव्हा अपघात मृत व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे होतो, तेव्हा विमा कंपनीवर कोणतीही भरपाईची जबाबदारी राहात नाही.

या निर्णयामुळे भविष्यकाळात वाहनचालकांना अधिक जबाबदारीने व सुरक्षितपणे वाहन चालवण्याचा संदेश दिला गेला असून, विमा दाव्यांबाबतही स्पष्टता निर्माण झाली आहे.

Total Visitor Counter

2475430
Share This Article