रायगड : जिल्ह्यातील महाड येथे सुरू असलेल्या पारितोषिक वितरण समारंभादरम्यान एका शाळकरी विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या महाड विद्या संकुलात आंतरशालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेनंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.
मृत विद्यार्थिनीचे नाव निधी समीर म्हात्रे (वय १३, रा. वालवडे, पोस्ट शहाबाद, ता. अलिबाग) असे आहे. निधी ही समारंभासाठी उपस्थित होती. तिच्या मैत्रिणीला पारितोषिक मिळाल्याचा आनंद साजरा करत तिने बक्षीस स्वीकारतानाचा फोटो काढला. त्यानंतर आपल्या जागेकडे परत येत असताना ती अचानक खाली कोसळली.
घटनेनंतर निधीला तातडीने जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण विद्या संकुलात शोककळा पसरली असून महाड शहरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आनंदाच्या क्षणी घडलेल्या या घटनेमुळे उपस्थितांवर शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू






