साडवली : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. गावांच्या विकासाचे ध्येय घेऊन स्थापन झालेल्या गाव विकास समितीने ‘मिशन जिल्हा परिषद’ अंतर्गत आपला उमेदवार निश्चित केला असून, साडवली (ओझरे) जिल्हा परिषद गटातून हरपुडे येथील सौ. अन्वी महेंद्र घुग यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
गाव विकास समितीचे संघटन प्रमुख श्री. सुहास खंडागळे आणि अध्यक्ष श्री. उदय गोताड यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती एडवोकेट सुनील खंडागळे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. गावांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी आणि गावांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली एक सक्षम उमेदवार देण्याचा गाव विकास समितीचा मानस असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
संघटन प्रमुख सुहास खंडागले व अध्यक्ष उदय गोताड यांच्या नेतृत्वाखालील गाव विकास समितीने “विचार बदला… गाव बदलेल!” हे घोषवाक्य दिले आहे. या माध्यमातून त्यांनी प्रस्थापित राजकीय विचारांना बदलून गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
सौ. अन्वी महेंद्र घुग यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून गावांच्या विकासासाठी नागरिक म्हणून सर्वांनी साथ द्यावी, असे भावनिक आवाहनही गाव विकास समितीने केले आहे. या घोषणेमुळे साडवली जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.