GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : जुन्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला; एक जखमी, दोन्ही गटांतील 7 जणांवर गुन्हा

Gramin Varta
296 Views

संगमेश्वर : तालुक्यातील कुंडी कदमवाडी येथे गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

या घटनेत एकूण सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव सुनिल दिलीप मांजरेकर असे असून, अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव मनोहर वासुदेव खामकर असे आहे.

देवाख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पहिली फिर्याद संतोष जयराम मांजरेकर (वय 45) यांनी दिली आहे. संतोष मांजरेकर आणि मनोहर खामकर हे शेजारी असून, पावसाचे पाणी पायवाटेवर पडते या कारणावरून गेली दहा वर्षे त्यांच्यात वाद सुरु होता.

गुरुवारी रात्री सुनिल मांजरेकर (फिर्यादीचा पुतण्या) मनोहर खामकर यांच्या घरी जाऊन, “नेहमी आमच्याविरुद्ध अर्ज का देतोस?” असे विचारल्याने वाद झाला. त्यावर राग आल्याने मनोहर खामकर याने सुनिलच्या डोक्यावर कोयत्याने वार केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

भिकाजी सावंत व विमल नावाच्या महिलेने सुनिलला पकडून ठेवले होते. या फिर्यादीनुसार मनोहर खामकर (35), भिकाजी धोंडू सावंत (55) आणि विमल नामक महिला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सुनिल मांजरेकर याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनोहर खामकर याला रात्रीच पोलिसांनी अटक केली असून शुक्रवारी त्याला देवाख न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जखमी सुनिल मांजरेकर याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

दरम्यान, दुसरी फिर्याद भिकाजी सावंत यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री 10 वाजता सुनिल मांजरेकर हा हातात ‘हिरका’ (लाकडी काठी) घेऊन येऊन “मनोहरला ठार मारतो” असे म्हणत शिवीगाळ करू लागला. त्याने हिरका फेकून मारल्याने भिकाजी सावंत जखमी झाले. त्यांच्यासह मनोहरला मारण्यासाठी आणखी तिघे जण धावून आले, असे या फिर्यादीत नमूद आहे.

या दुसऱ्या फिर्यादीवरून सुनिल मांजरेकर, संतोष मांजरेकर, संजय देवजी मांजरेकर आणि विजय देवजी मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3366722
Share This Article