GRAMIN SEARCH BANNER

खेड तालुक्यातील देवघर येथील मंदिरात चोरी; पितळी घंटांसह समया लंपास

खेड: तालुक्यातील निवाचीवाडी, देवघर येथील जननी भोमेश्वरी मंदिरात अज्ञात चोरट्याने डल्ला मारत पितळी घंटा आणि समयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्थानिक रहिवासी गंगाराम रामलिंग जंगम यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ही चोरी ४ जानेवारी सकाळी ९ ते ५ जानेवारी सकाळी ९ च्या दरम्यान घडली असून, या कालावधीत चोरट्याने नेहमी उघड्या असणाऱ्या या मंदिरात प्रवेश करून देवघरातील मौल्यवान वस्तू पळवल्या आहेत.

चोरट्याने मंदिरातील प्रत्येकी २ हजार रुपये किमतीच्या तीन पितळी घंटा आणि प्रत्येकी ५ हजार रुपये किमतीच्या दोन पितळी समया असा एकूण १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरातील हे साहित्य जुने आणि वापरते होते, जे चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने चोरून नेले आहे. या घटनेची रीतसर नोंद २३ फेब्रुवारी रोजी रात्री खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील मंदिरात झालेल्या या चोरीमुळे स्थानिक भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Total Visitor Counter

3485590
Share This Article