GRAMIN SEARCH BANNER

बनावट कागदपत्रांद्वारे ७० लाखांच्या आलिशान गाड्यांची विक्री; रत्नागिरीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी: बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल ७० लाख रुपये किमतीच्या चार आलिशान मोटारींची परस्पर विक्री करणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश रामचंद्र सुर्वे (वय ३३, रा. खेडी, शिवाजीनगर, चिपळूण) आणि हसन मगदूम जहागीरदार (वय ३१, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सागर हरी देसाई (वय ३८, रा. टेंबलाईवाडी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सागर देसाई हे कमिशन बेसिसवर मोटारींची विक्री करण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी त्यांच्या मालकीच्या चार आलिशान मोटारी विक्रीसाठी संजय हवालदार (कळंबा), नीलेश सुर्वे आणि हसन मगदूम यांच्याकडे दिल्या होत्या. या मोटारींच्या विक्रीतून २ लाखांचे कमिशन देण्याचे आश्वासन हवालदार आणि इतर आरोपींनी देसाई यांना दिले होते.
एप्रिल २०२४ ते मे २०२४ या कालावधीत आरोपींनी या मोटारी ताब्यात घेतल्या, मात्र त्यांनी देसाई यांना कोणताही मोबदला दिला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून या चारही मोटारी महंमद हाजी (छत्रपती संभाजीनगर) आणि मनीष फुके (नागपूर) यांना परस्पर विकल्या.

हा प्रकार देसाई यांच्या लक्षात येताच, आपली ७० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर, त्यांनी २२ मे २०२५ रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत रत्नागिरीतील या दोन एजंटांना अटक केली. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

2474947
Share This Article