राजापूर : भू-बाजार ते राजापूर रोडदरम्यान अवैध दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला राजापूर पोलिसांनी बुधवारी (२३ जुलै २०२५) रात्री अटक केली. त्याच्या ताब्यातून गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भू-बाजार ते राजापूर रोडदरम्यान अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह बुधवारी सायंकाळच्या सुमारास छापा टाकला.
या छाप्यात राकेश शिवाजी खालविलकर (वय २५, रा. राजापूर, खडपेवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हा व्यक्ती २० सीलबंद गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या बाटल्या स्वतःच्या ताब्यात विनापरवाना विक्रीसाठी बाळगलेला स्थितीत मिळून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
आरोपीकडून १८० मिली मापाच्या, प्रत्येकी ६००/- रुपये किमतीच्या एकूण २० सीलबंद गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) नुसार गुन्हा (गु.आर.नं. १३५/२०२५) दाखल करण्यात आला आहे. राकेश खालविलकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.