रायगड : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यावेळी पुढाऱ्यांच्या घरातील लेकी-सुनांचा जोरदार बोलबाला पाहायला मिळत आहे. राजकारणात वारसांना संधी देण्याची परंपरा नवीन नाही; मात्र या निवडणुकीत एकाचवेळी चार तरुणी नगराध्यक्षपदासाठी थेट रिंगणात उतरल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष त्यांच्या दिशेने वेधले गेले आहे.
रायगडमधील राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद, पदाधिकाऱ्यांची घरवापसी आणि पक्षांतरांच्या हालचालींमुळे जिल्हा राज्यभर चर्चेत आहे. अशा पार्श्वभूमीवर दहा नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या कुटुंबीयांना मैदानात उतरवले आहे. महिला आरक्षणाच्या जागांवर आपल्या घरातील सदस्यांना उमेदवारी देण्याची प्रथा कायम असून, यंदा चार लेकी-सुनांनी थेट नगराध्यक्षपदाला टक्कर देण्याची तयारी केली आहे.
अलिबागमध्ये माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अक्षया नाईक यांना शेकापने उमेदवारी दिली आहे. अवघ्या २२ वर्षांतील अक्षया या निवडून आल्यास रायगडातील सर्वांत तरुण नगराध्यक्षा ठरतील. मुरुडमध्ये माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्या कन्या आराधना नाईक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर रिंगणात आल्या आहेत. पेणमध्ये भाजप आमदार रवींद्र पाटील यांच्या सुनबाई प्रीतम पाटील यांना पुन्हा संधी मिळाली असून त्या यापूर्वी सलग दोन वेळा नगराध्यक्षा राहिल्या आहेत. तर कर्जत येथे माजी आमदार सुरेश लाड यांच्या सुनबाई डॉ. स्वाती लाड या भाजपच्या उमेदवार म्हणून समोर आल्या आहेत.
यापैकी प्रीतम पाटील अनुभवी असून उर्वरित तिघी पहिल्यांदाच थेट नगराध्यक्षपदासाठी दावेदारी करत आहेत. सर्वच उमेदवारांनी शहरात जोरदार प्रचार मोहीम सुरू केली आहे. नव्या चेहऱ्यांना मतदारांकडून किती प्रतिसाद मिळतो, कोण बाजी मारणार आणि कोण पुढील स्थानिक नेतृत्व म्हणून उदयास येणार, याकडे आता रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
रायगड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत पुढाऱ्यांच्या लेकी-सुनांचा बोलबाला





