मंडणगड : तालुक्यातील धुत्रोली येथील हनुमानवाडी परिसरात भरदिवसा एका वृद्ध महिलेच्या घरातून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने आणि काही रोकड चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे पाच लाख रुपये असावी, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
सरस्वती सुगदरे (वय ६५) ही वृद्ध महिला १५ तारखेला दुपारी वरील नमूद वेळेत आपल्या नातवाला शाळेतून घरी आणण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. घराला आतून कडी लावून आणि मागील दरवाजाची कडी बंद करून त्या निघून गेल्या होत्या. नेमकी हीच संधी साधून चोरट्याने पाळत ठेवून घरात प्रवेश केला. अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाची आतल्या बाजूने लावलेली कडी उचकटून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील कपाटाची कडी उघडून कपाटातील सोन्याच्या अंगठ्या, बांगड्या, कानातले यांसारखे सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने आणि कपाटातील रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. चोरी केल्यानंतर चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि पसार झाला.
नातवाला घेऊन सरस्वती सुगदरे घरी परतल्यावर, त्यांना मुख्य दरवाजाची विशिष्ट स्थिती बदलल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने वाडीतील ग्रामस्थांना बोलावून घेतले आणि तपासणी केल्यावर घरात चोरी झाल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांच्यामार्फत मंडणगड पोलीस ठाण्याला देण्यात आली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन गवारे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी पंचनामा केला. घरात आढळलेल्या विशिष्ट खुणांच्या आधारावर पोलीस पथकाने चोरीचा छडा लावण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात पंचनाम्याचे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.