रत्नागिरी : देशसेवेनंतर समाजसेवेची प्रेरणादायी परंपरा जपत भारतीय संरक्षण दलातील माजी सैनिक कै. अनंत नरहर गोखले (वय ७८) यांच्या पार्थिवाचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी मरणोत्तर देहदान करण्यात आले. रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नुकतेच हे २२ वे देहदान पार पडले.
मूळचे लिमयेवाडी (कर्ला, रत्नागिरी) येथील रहिवासी असलेले कै. अनंत गोखले यांचे गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार तसेच कुटुंबीयांच्या संमतीने त्यांचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीररचनाशास्त्राचा प्रत्यक्ष अभ्यास करता यावा तसेच भविष्यातील वैद्यकीय संशोधनाला हातभार लागावा, या उदात्त सामाजिक हेतूने गोखले कुटुंबीयांनी देहदानाचा निर्णय घेतला. देशसेवेसाठी आयुष्याचा महत्त्वपूर्ण काळ समर्पित केलेल्या कै. गोखले यांच्या देहदानाच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी समाजासमोरही एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
पार्थिव महाविद्यालयाकडे सुपूर्द करताना कै. गोखले यांची कन्या रूपाली लिमये, जावई मंदार लिमये, तसेच राजीव लिमये, मिताली भिडे, दिनेश आगाशे, शिरीष सोहोनी आणि मित्रपरिवार उपस्थित होता. देहदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समीर करमरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिष्ठाता डॉ. रामा भोसले, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव यांच्यासह पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहीर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयश जोशी, श्रीपाद गांधी आणि वाहन चालक प्रणय पाटील यांनी देहदानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.
देशसेवेनंतर वैद्यकीय शिक्षणासाठीही योगदान
कै. अनंत गोखले यांनी संरक्षण दलात सेवा बजावत देशासाठी योगदान दिले. त्यांच्या निधनानंतरही त्यांचे पार्थिव वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या देहदानातून देशसेवेनंतर समाजोपयोगी कार्याची एक नवी प्रेरणादायी वाट निर्माण झाली आहे.
गोखले कुटुंबीयांनी घेतलेल्या या समाजोपयोगी निर्णयाबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कृतज्ञता व्यक्त केली असून, देहदानासारख्या सामाजिक उपक्रमांबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाकडून नमूद करण्यात आले.
वैद्यकीय संशोधनासाठी माजी सैनिक अनंत गोखले यांचे देहदान; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२ वे मरणोत्तर देहदान
Leave a Comment




