GRAMIN SEARCH BANNER

ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या अस्थींचे माडबन समुद्रात विसर्जन

Gramin Varta
17 Views

९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० नंतर विधी, अस्थिकलशाचे दर्शन सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत

राजन लाड | जैतापूर

मालवणी रंगभूमीचे लाडके, प्रख्यात नाटककार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते कै. गंगाराम गवाणकर यांच्या अस्थींचे विसर्जन त्यांच्या मूळगावी राजापूर तालुक्यातील माडबन समुद्रात रविवार, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० नंतर करण्यात येणार आहे.

या अगोदर त्यांच्या माडबन येथील राहत्या घरी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत अस्थिकलशाचे दर्शन सर्वांसाठी ठेवण्यात आले असून, त्यांच्या चाहत्यांना, मित्रपरिवाराला आणि नाट्यप्रेमींना अंतिम दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

गवाणकर यांचे २७ ऑक्टोबर रोजी मुंबईत उपचारादरम्यान दुःखद निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुंबईतच पार पाडण्यात आले होते. त्यानंतर अस्थिकलश ८ नोव्हेंबर रोजी माडबन येथे आणला जाणार असून, दुसऱ्या दिवशी समुद्रात विसर्जन केले जाईल, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

गंगाराम गवाणकर यांचे मूळ गाव माडबन हेच त्यांचे कायमचे वास्तवस्थान होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते याच भूमीत स्थायिक राहून आपल्या लेखणी आणि अभिनयाच्या माध्यमातून कोकणचा अभिमान वाढवत होते.

त्यांनी लिहिलेली आणि रंगभूमीवर गाजलेली ‘वस्त्रहरण’, ‘वात्रट मेले’, ‘वन रूम किचन’ यांसारखी नाटके आजही प्रेक्षकांच्या मनात अजरामर आहेत. त्यांच्या ‘व्हाया वस्त्रहरण’ या आत्मचरित्रातून त्यांनी आपला नाट्यमय प्रवास हृदयस्पर्शी पद्धतीने मांडला आहे.

गवाणकर हे केवळ नाटककार नव्हते, तर सर्वसामान्य जनतेत मिसळून जाणारे, साधेपणाने जगणारे आणि प्रत्येकाला आपलेसे करणारे कलाकार होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कोकण आणि मराठी नाट्यजगतावर शोककळा पसरली होती.

आता त्यांच्या अस्थी विसर्जन विधीला उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे.
त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सर्वांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3366911
Share This Article