GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत बॉक्साइटच्या ओव्हरलोड डंपरचा थरार; दोन महिन्यांत दुसऱ्यांदा अपघात झाल्याने नागरिकांमध्ये संताप

Gramin Varta
154 Views

दापोली: दापोली तालुक्यातील रोवले उंबरशेत येथून मांदिवलीकडे जाणाऱ्या मार्गावर बॉक्साइटची वाहतूक करणाऱ्या डंपरला भीषण अपघात झाला असून, गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. सातत्याने होणाऱ्या या अपघातांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. रोवले उंबरशेत परिसरातून बॉक्साइटचे उत्खनन करून ते मांदिवलीकडे नेले जात असताना, भररस्त्यात डंपर उलटल्याची घटना आज घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो रस्ता अत्यंत मोकळा आणि सरळ आहे.

अशा स्थितीत डंपर उलटणे अनाकलनीय असून, केवळ अतिवेग आणि क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या मालामुळेच चालकाचा ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या मार्गावरून दररोज अनेक ओव्हरलोड डंपर भरधाव वेगाने धावत असतात, ज्यामुळे इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. दोन महिन्यांपूर्वीच याच परिसरात अशाच प्रकारचा अपघात झाला होता, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याचीही दुरवस्था होत असून, एखादी मोठी जीवितहानी होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन डंपरच्या वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवावे आणि ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Total Visitor Counter

3388195
Share This Article