GRAMIN SEARCH BANNER

सहकार क्षेत्रातील दूरदृष्टीसंपन्न नेतृत्व : दत्ताराम चाळके

Gramin Varta
89 Views

अमृत महोत्सव (75 वा) वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष!

प्रत्येक माणसामध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असते, पण समाजाच्या हितासाठी विचार करणारी, प्रवाहाच्या विरोधात जाऊन कार्य करणारी मोजकीच व्यक्तिमत्त्वे समाजमनात कायम स्मरणात राहतात. अशा व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे अपना सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. दत्ताराम चाळके — सहकार क्षेत्रातील कुशल, शिस्तप्रिय आणि लोकाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक.

२ नोव्हेंबर १९५० रोजी गिरणी कामगाराच्या कुटुंबात जन्मलेल्या चाळके साहेबांचे बालपण नायगाव-वडाळा या गिरणगावात गेले. श्रमिक वर्गाच्या संघर्षाचे आणि त्यांच्या जीवनातील वेदनांचे दर्शन बालपणापासूनच झाल्यामुळे सामाजिक संवेदनशीलता त्यांच्या व्यक्तिमत्वात नैसर्गिकरित्या रूजली. प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेत आणि माध्यमिक शिक्षण परेलच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक आणि सामाजिक जाणीव यांची रुजवात इथेच झाली.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी माटुंगा येथील खालसा कॉलेजची वाट धरली. आर्थिक अडचणींना न जुमानता त्यांनी शिकवण्या घेऊन, उन्हाळ्यात मिलमध्ये काम करून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. या संघर्षातून त्यांच्यातील आत्मविश्वास आणि कर्मनिष्ठा अधिकच दृढ झाली.

त्या काळात गिरणगावात सहकार चळवळीची नवीन लाट उसळली होती. सामाजिक आणि सहकारी कार्यकर्त्यांच्या प्रभावामुळे चाळके साहेबांनीही सहकार क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान केंद्र शासनाच्या क्लास-वन अधिकाऱ्याच्या पदावर त्यांनी कार्य केले, परंतु सहकार क्षेत्रातील ओढ मात्र कायम राहिली. अपना बाजारच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मेडीकल स्टोअरचे सचिवपद भूषविले आणि पुढे संचालक म्हणून दीर्घकाळ योगदान दिले.

अपना बँकेची धुरा हातात घेतल्यानंतर २ ऑगस्ट २००३ रोजी अपना बँकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने उल्लेखनीय प्रगती साधली. १३ शाखांवरून ८५ शाखांपर्यंतचा प्रवास आणि ५५० कोटींच्या व्यवसायावरून तब्बल ६,००० कोटींपर्यंत झालेली भरारी हे त्यांच्या दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण आहे. बँकेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद आणि ग्राहक यांच्या सहकार्याने त्यांनी बँक केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही तर सामाजिकदृष्ट्याही जबाबदार केली. रिझर्व्ह बँक आणि विविध संस्थांकडून मिळालेले २७ राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार हे त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे आणि प्रामाणिक नेतृत्वाचे प्रतीक आहेत. बँकेत व्यावसायिक शिस्त निर्माण करून कर्मचाऱ्यांशी कौटुंबिक नाते जोडले — ही त्यांची मोठी जमेची बाजू ठरली.
सहकार क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या सान्निध्यात राहूनही त्यांनी स्वतःचे स्वतंत्र विचार आणि तत्त्वनिष्ठ भूमिका कायम राखली. त्यांच्यासाठी नेतृत्व म्हणजे पद नव्हे, तर जबाबदारी — आणि ही जबाबदारी त्यांनी मनोभावे पार पाडली.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, सहकार क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली परंपरा, बँकेला दिलेला स्थैर्याचा आणि विश्वासाचा पाया यासाठी आपण सर्व त्यांचे आभारी आहोत.
त्यांच्या आरोग्यास, आयुष्याच्या दीर्घायुष्यास आणि अधिकाधिक यशस्वी कार्यासाठी *हार्दिक शुभेच्छा!*

— श्री. संतोष केसरकर, संगमेश्वर
संचालक, संगमेश्वर तालुका सहकारी पतपेढी लि.

Total Visitor Counter

3131056
Share This Article