लांजा: लांजा नगरपंचायतीच्या दुर्लक्षित आणि बेजबाबदार कारभाराचा फटका कुवे गावातील ग्रामस्थांना बसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून गावातील शासकीय जागेत टाकण्यात येणारा कचरा डेपो स्थलांतरित करण्याच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कुवे येथील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊनही कचरा डेपो हलवला नसल्याने, ग्रामस्थ येत्या १५ ऑगस्ट रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
या संदर्भात, कुवे संघर्ष समितीने २७ जून रोजी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निवेदन सादर करून कचरा डेपो तात्काळ हलवण्याची मागणी केली होती. या कचरा डेपोमुळे लोकांना आरोग्याचा त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी १४ जुलै रोजी संघर्ष समितीला पत्र पाठवून पुढील १५ दिवसांत कचरा डेपो स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, ३१ जुलैपर्यंत या आश्वासनाची पूर्तता झाली नाही आणि कचरा आजही कुवे येथेच टाकला जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या कुवे संघर्ष समिती आणि ग्रामस्थांनी नगरपंचायत प्रशासनाच्या कारभाराविरोधात १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपोषणाबाबतचे निवेदन शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. यावेळी कुवे संघर्ष समितीचे मदन राडये, अशोक गुरव, दिनानाथ सुर्वे, परवेश घारे, संतोष दुडये, संतोष निवळे, संदीप गुरव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.