राजापुरात वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने उभी करणाऱ्या तिघांवर पोलिसांची कारवाई

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

राजापूर:राजापूर शहरातील गजबजलेल्या जवाहर चौक ते जकात नाका या मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल आणि पादचाऱ्यांच्या जीवितास धोका होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या तीन चालकांविरुद्ध राजापूर पोलिसांनी शुक्रवारी जोरदार कारवाई केली आहे. सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहने उभी करून सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या या चालकांविरोधात भारतीय दंड संहिता कलम २८५ नुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, १३ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३५ वाजेच्या सुमारास नगरवाचनालयासमोर विनोद विद्याधर घाटे (वय ३७, रा. वैभववाडी) याने आपली टाटा टिगर गाडी (एम.एच. १० इ.इ. ०१४८) रस्त्यावर अडथळा ठरेल अशा स्थितीत उभी केल्याचे पोलीस शिपाई सागर कातकर यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर काही वेळातच, सकाळी ११:४५ च्या दरम्यान मेघा स्वीटमार्ट समोर गणेश लवु पाटील (वय ३४, रा. जुवाठी, राजापूर) याने आपली महिंद्रा झायलो गाडी (एम.एच. ०३ ए.आर. ५९५७) उभी करून पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केला होता. कारवाईचे हे सत्र सुरू असतानाच दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास चौगले फार्मसीसमोर स्वप्निल पांडुरंग चिपटे (वय २७, रा. पेंडखळे, राजापूर) याने आपली मारुती सुझुकी इको गाडी (एम.एच. ०२ सी.डी. ४२४९) वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने उभी केल्याचे आढळून आले.

या तिन्ही घटनांमध्ये पोलीस शिपाई उत्तम रेडेकर आणि सागर कातकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, राजापूर पोलीस ठाण्यात गु.आर.क्र. ६१/२०२६, ६२/२०२६ आणि ६३/२०२६ नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. सार्वजनिक रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहने उभी करणाऱ्या वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा अशीच कठोर कारवाई सुरू राहील असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *