हातिवले बस स्थानकावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणावर राजापूर पोलिसांची कारवाई

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

राजापूर:राजापूर तालुक्यातील हातिवले बस स्टॉप परिसरात दारूच्या नशेत धिंगाणा घालून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी, १३ मार्च २०२६ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अनंत संतोष अवसरे (वय ३० वर्षे, रा. पडवे अवसरेवाडी, ता. राजापूर) हा तरुण हातिवले बस स्टॉपसमोरील सार्वजनिक रोडवर दारू पिऊन नशेत होता. तो रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरड करून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना तसेच स्थानिकांना त्रास होईल अशा पद्धतीने धिंगाणा घालत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला.

राजापूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई प्रतीक्षा लक्ष्मण कोंडवळ यांनी याप्रकरणी तातडीने दखल घेत त्याला ताब्यात घेतले.संबंधित तरुणाची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याने मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावरून स्पष्ट झाले आहे. यावरून पोलिसांनी त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ८५ (१), (२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत कोणताही मुद्देमाल जप्त करण्यात आला नसून, केवळ नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शांतता भंग करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *