कौटुंबिक वादातून टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज
चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथून २३ सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या अपेक्षा अमोल चव्हाण (वय ४०) यांचा मृतदेह आज (२५ सप्टेंबर) सकाळी 11.30 वाजता कालूस्ते खाडीत आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
२४ सप्टेंबरच्या रात्रीच गांधारेश्वर पुलावर अपेक्षांच्या चप्पल, पर्स आणि मोबाईल फोन सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र मृतदेह सापडला नसल्याने दोन दिवसांपासून गावात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. पोलिसांनी सातत्याने शोध सुरू ठेवत गुरुवारी सकाळी चिपळूणचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक राठोड, पोलिस हेड कॉन्स्टेबल आशिष बल्लाळ आदी टीम घटनास्थळी पोहोचली. पुन्हा तपास घेतला आणि सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास कालुस्ते खाडीत तिचा मृतदेह सापडला.
सविस्तर वृत्त असे की, अपेक्षा २३ सप्टेंबर रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याची तक्रार पतीने संगमेश्वर पोलिस ठाण्यात नोंदवली होती. मोबाईल लोकेशनची पडताळणी केली असता तिचे शेवटचे लोकेशन गांधारेश्वर पुलावर आढळले. त्यानंतरच शोधमोहीम सुरू झाली होती.
पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की कौटुंबिक वादातून तिने टोकाचा निर्णय घेतला असावा. संपूर्ण घटनेचा तपास पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशानुसार संगमेश्वर पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय साळवी व पथक करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे शिवधामापूर परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून अपेक्षाच्या अकाली निधनाबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ब्रेकिंग : संगमेश्वरातील बेपत्ता महिलेचा मृतदेह चिपळुणातील कालुस्ते खाडीत सापडला
