मुंबई: भारतीय पुरुष संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी खेळत असताना दुसऱ्या बाजूला भारतीय महिला संघ तिथं मर्यादित षटकांची मालिका खेळत आहे. टी-२० मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वनडेतही दमदार सुरुवात केलीये.
साउथहॅम्पनच्या मैदानातील पहिल्या वनडे सामन्यातील विजयासह भारतीय महिला संघाने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवलीये. या सामन्यात स्मृती मानधना हिने प्रतिका रावलच्या साथीनं वर्ल्ड रेकॉर्डचा डाव साधला आहे.
भारताच्या सलामी जोडीनं रचला नवा इतिहास
इंग्लंड महिला संघाने दिलेल्या २५९ धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचली. दोघींपैकी कुणालाच मोठी धावसंख्या करता आली नसली तरी या भागीदारीसह या जोडीनं महिला वनडे क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा पार केला. एवढेच नाही तर सर्वोत्तम सरासरीसह हा पल्ला गाठत दोघींनी नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलाय.
भारताकडून हजार धावसंख्येचा पल्ला गाठणारी तिसरी जोडी, पण सरासरी सगळ्यात भारी
स्मृती मानधना आणि प्रतिका रावल ही भारतीय महिला संघाकडून १००० धावांची भागीदारी करणारी तिसरी जोडी ठरली. या सलामी जोडी आधी जया शर्मा आणि अंजू जैन या दोघींनी डावाची सुरुवात करताना १२२९ धावांची भागीदारी रचल्याचा विक्रम आहे. याशिवाय जया शर्मा आणि करुणा जैन या दोघींनी ११६९ धावा केल्या आहेत. स्मृती आणि प्रतिकानं सर्वोत्तम सरासरीसह हजार धावसंख्येचा टप्पा गाठत कॅरोलीन एटकिंस आणि सारा टेलर यांचा विक्रम मोडीत काढला आहे.
सर्वोत्तम सरासरीसह धावा करणाऱ्या सलामी जोडीचा रेकॉर्ड (कमीत कमी १००० धावा)
स्मृती मामनधना आणि प्रतिका रावल – ८४.६ च्या सरासरीसह (भारत)
कॅरोलीन एटकिंस आणि सारा टेलर – ६८.८ च्या सरासरी (इंग्लंड)
रेचल हेन्स आणि एलिसा हीली – ६३.४ च्या सरासरीसह (ऑस्ट्रेलिया)
टॅमी ब्युमॉन्ट आणि एमी जोन्स – ६२.८ च्या सरासरीसह (इंग्लंड)
बेलिंडा क्लार्क आणि लिसा केइटली – ५२.९ च्या सरासरीसह (ऑस्ट्रेलिया)
स्मृती-प्रतिकानं १२ डावात साधला हा मोठा डाव
कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे शेफाली वर्माचा वनडे संघातील पत्ता कट झाल्यावर प्रतिका रावल हिला स्मृतीसोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. २४ वर्षीय बॅटरनं मिळालेल्या संधीच सोनं करून दाखवलं आहे. दोघींनी मागील १२ डावात १००० धावांचा पल्ला गाठला आहे. प्रतिकाच्या कामगिरीबद्दल बोलायचं तर १२ वनडेत तिने ५१.२७ च्या सरासरीसह ६७४ धावा केल्या आहेत. यात एका शतकासह ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
