राजापूर / प्रतिनिधी
गेली 4 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी रात्रीपासूनच आणखी जोर धरला. परिणामी मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा बसला असून जवाहर चौकातील राधाकृष्ण कोल्ड्रिंक्सपर्यंत पाणी पोहोचले आहे. शहरातील शीळकडे जाणारा मार्ग तसेच बहुतांश भाग पाण्याखाली गेला असून नागरिक व व्यापारी धास्तावले आहेत. व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे.
अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने व कोदवली नदीचे पाणी बाजारपेठेत घुसल्याने शहरातील भटाळी, गुजराळी, वरचीपेठ, चिंचबांध, आंबेवाडी आदी परिसर पुरग्रस्त झाले आहेत. शिवाजी पथ रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला असून येथील दुकानदार व रहिवासी आपली सामग्री सुरक्षित स्थळी हलवताना दिसले.
मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जवाहर चौक पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. हवामान खात्याने कोकणातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्रीच सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. तालुक्यातील अनेक भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राजापूरला पुराचा वेढा; जनजीवन विस्कळीत, अनुस्कुरा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
