राजकारण म्हणजे केवळ सत्ता, पद किंवा अधिकार नसून समाजाच्या प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी केवळ शब्दांत न मांडता आपल्या प्रत्यक्ष कृतीतून निभावणारे आणि जनतेच्या अढळ विश्वासावर आपले नेतृत्व उभे करणारे व्यक्तिमत्व म्हणजे लांजा–राजापूर–साखरपा मतदारसंघाचे आमदार मा. श्री किरण उर्फ भैया सामंत साहेब. त्यांचे नेतृत्व केवळ व्यासपीठापुरते मर्यादित नसून ते गावागावांत, वाड्यावस्त्यांवर आणि थेट सामान्यांच्या प्रश्नांपर्यंत पोहोचलेले आहे. गरिब, शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवक अशा समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करणे हीच त्यांची खरी ओळख निर्माण झाली आहे.
मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सेवा आणि शिक्षण यांसारख्या पायाभूत सुविधांचा विकास करताना त्यांनी केवळ घोषणांवर भर न देता प्रत्यक्ष अंमलबजावणीला प्राधान्य दिले आहे. प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधून रखडलेली कामे मार्गी लावण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. शिक्षण हा विकासाचा पाया मानून त्यांनी शैक्षणिक सुविधांच्या सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष दिले असून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी नेहमीच संवेदनशील भूमिका घेतली आहे.
भैया सामंत साहेबांची खरी ताकद ही त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. त्यांचे कार्यालय हे सर्वसामान्यांसाठी सदैव खुले असलेले व्यासपीठ असून तिथे प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाते. आजच्या बदलत्या राजकीय परिस्थितीतही मूल्य, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता जपण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. विकास आणि सामाजिक सलोखा या सूत्रांवर आधारित त्यांचे कार्य मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आश्वासक ठरत आहे. अशा या लोकाभिमुख आणि कार्यक्षम नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. जनसेवेचे हे व्रत त्यांच्या हातून असेच अखंडपणे सुरू राहो आणि जनतेचा त्यांच्यावरील विश्वास अधिक वृद्धिंगत होत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
लेखन: तोसिफ अब्दुल रहीम पांजरी






