GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी मिरजोळेत बिबट्याचा धुमाकूळ; चार गुरे ठार, परिसरात दहशत

Gramin Varta
488 Views

रत्नागिरी / प्रतिनिधी:  रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे येथील सोनारवाडी जंगल परिसरात बिबट्याने थैमान घालत एकाच रात्री चार गुरांवर हल्ला करून त्यांना ठार केले. यापैकी एका गुराचा अक्षरशः फडशा पाडल्याचे उघड झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुरांची कत्तल झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र दहशत निर्माण झाली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांत हा हल्ला झाल्याचा अंदाज असून मिरजोळेसह मुक्तसार, खेडशी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गुरे जंगलात चरण्यासाठी गेली असताना बिबट्याने दबा धरून हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर सोनारवाडी व मिरजोळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रकरणाची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य रत्नदीप पाटील यांनी वनविभागाला कळवले. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत गुरांचे दफन केले. मात्र, वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे बिबट्यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमार्फतही वनविभागाकडे कारवाईची मागणी नोंदवण्यात आली आहे.

मिरजोळे, शिळ, केळ्ये, मजगाव, फणसवळे आणि खेडशीतील डफळोळ वाडी परिसरात बिबट्याची दहशत अनेक वर्षांपासून कायम आहे. गुरे, शेळ्या तसेच पाळीव कुत्र्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. रात्रीच्या वेळी घरांच्या अंगणात बांधलेल्या कुत्र्यांनाही लक्ष्य केले जात असून आंबा बागायतींमध्ये काम करणारे मजूर आणि गुराखी जीव मुठीत धरून वावरत आहेत. बिबट्याचा हा वाढता उपद्रव थांबवण्यासाठी तातडीची कारवाई न झाल्यास मोठा अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे

Total Visitor Counter

3072102
Share This Article