GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : कुचांबे येथील भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Gramin Varta
1.3k Views

संगमेश्वर : तालुक्यातील कुचांबे थेराडेवाडी परिसरात असलेल्या पऱ्याच्या पुलावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, मागे बसलेला एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हा अपघात २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ११.३० ते ११.४५ वाजण्याच्या सुमारास कुचांबे–आरवली मार्गावर घडला. सुशांत सुरेश कदम (वय ३१, रा. कुचांबे बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) हे आपल्या होंडा हॉर्नेट मोटारसायकलवर (क्र. एमएच ०४ जेडी ६७०६) आरवलीच्या दिशेने जात होते. त्यांच्या दुचाकीवर मागे प्रताप दिलीप कदम हे बसले होते.

सदर मार्ग हा वळणाचा तसेच चढ-उताराचा असल्याने परिस्थितीचा योग्य अंदाज न घेता दुचाकी अतिवेगात व निष्काळजीपणे चालवली जात होती. त्याच वेळी आरवलीकडून येणारा टाटा कंपनीचा मालवाहू ट्रक (क्र. एमएच ०८ एच ०८४५) अचानक समोर आल्याने दुचाकीस्वाराने घाबरून जोरात ब्रेक मारले. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर घसरली व समोरून येणाऱ्या ट्रकच्या उजव्या बाजूच्या मागील चाकाला धडकली.

या अपघातात सुशांत कदम यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मागे बसलेले प्रताप दिलीप कदम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार संदेश सिताराम जाधव (पो.हे.कॉ. ब.नं. ५८) यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मृत तरुणाची आई सुप्रिया सुरेश कदम यांनी सांगितले की, पोलिस आमच्या घरी अधिक चौकशी करत आहेत. आम्ही त्यांना सहकार्यही करत आहोत. मात्र पोलिसांनी ट्रकचालकाची सुद्धा चौकशी करावी आणि त्यात दोषी आढळल्या गुन्हा दाखल करावा.

Total Visitor Counter

3213597
Share This Article