GRAMIN SEARCH BANNER

देवरुख नगरपंचायत निवडणूक: गाव विकास समिती डॉ. मंगेश कांगणेंच्या नेतृत्वाखाली मैदानात; पारदर्शक कारभाराचा मुद्दा

Gramin Varta
55 Views

कोअर कमिटीचा निर्णय: नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून दीक्षा खंडागळे-गीते व अनघा कांगणे यांच्या नावाची चर्चा

देवरुख :-देवरुख शहराच्या विकासासाठी आणि नागरी प्रश्नांवर काम करणारी ‘गाव विकास समिती’ आता देवरुख नगरपंचायत निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहे. गाव विकास समितीचे सरचिटणीस, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि शहराच्या प्रश्नांची जाण असलेले डॉ. मंगेश कांगणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गाव विकास समितीच्या कोअर कमिटीने घेतला आहे.
समितीच्या या निर्णयामागे डॉ. कांगणे यांचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व, शहर विकासाची नेमकी जाण आणि नगरपंचायत कारभार पारदर्शक असावा ही त्यांची ठाम भूमिका प्रमुख कारणे आहेत. डॉ. कांगणे यांचे सर्वसमावेशक नेतृत्व देवरुखच्या विकासाला नवी दिशा देईल, असा विश्वास गाव विकास समितीला आहे.

या आधीच देवरुख नगरपंचायत निवडणूक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून गाव विकास समितीकडून सौ अनघा कांगणे आणि सौ.दीक्षा खंडागळे गीते यांच्या नावाची चर्चा आहे.गाव विकास समितीचे अध्यक्ष श्री. उदय गोताड, संघटन प्रमुख श्री. सुहास खंडागळे, उपाध्यक्ष श्री. मंगेश धावडे, श्री. राहुल यादव आणि श्री. श्यामकर्ण भोपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली  गाव विकास समितीने हा लढा देण्याचे ठरवले आहे.या निर्णयानूसार, गाव विकास समिती केवळ देवरुख नगरपंचायतीपुरती मर्यादित न राहता, संगमेश्वर तालुक्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही सक्रिय भूमिका बजावणार आहे. समितीच्या या पवित्र्यामुळे देवरुखमधील आगामी नगरपंचायत निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

Total Visitor Counter

3366839
Share This Article