GRAMIN SEARCH BANNER

कार्यकर्त्यांच्या प्रश्नांसाठी भाजपचा ‘जनता दरबार’;चिपळूणमध्ये शेकडो तक्रारींची नोंद

Gramin Varta
3 Views

चिपळूण : कार्यकर्त्यांच्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळावे आणि त्यावर तातडीने कार्यवाही व्हावी या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली खाली हा उपक्रम राबविण्यात आला असून, त्यांच्या माध्यमातून विशेष कार्यकारी अधिकारी संतोष साखरे यांना चिपळूण येथे पाठविण्यात आले होते.

सकाळपासूनच कार्यकर्ते व नागरिकांनी विश्रामगृहात गर्दी केली होती. विविध विकासकामांबाबत निवेदने, वैयक्तिक तक्रारी, शासकीय योजनांतील अडचणी, पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न अशा विविध विषयांवर साखरे यांच्याकडे मांडणी करण्यात आली. प्राप्त झालेल्या तक्रारींची नोंद घेऊन त्यांचे वर्गीकरण करण्यात आले.

यातील तात्काळ निकाली काढता येणाऱ्या प्रश्नांबाबत साखरे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्वरित तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. काही प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून संबंधितांना मार्गदर्शनही करण्यात आले. उर्वरित प्रश्नांबाबत आवश्यक तो पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येईल व योग्य त्या स्तरावर विषय मांडून प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन साखरे यांनी दिले.

या जनता दरबाराला दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, सरचिटणीस स्वानंद रानडे, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, सरचिटणीस सारिका भावे, जिल्हा चिटणीस अनिल सावर्डेकर, समीर टाकळे, योगेश शिर्के, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शितल रानडे, महिला मोर्चा चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष आदिती गुडेकर, जिल्हा परिषद सदस्य रावी मोरे, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक, पंचायत समिती सदस्य सायली वाजे, सुप्रिया देवरुखकर, चिपळूण नगरपालिका बांधकाम सभापती शुभम पिसे, महिला बालकल्याण सभापती रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, अंजली कदम, अमोल तटकरे, जिल्हा सदस्य जनार्दन पवार, स्वाती देवळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य : प्रशांत यादव

दरम्यान, अशा प्रकारचे जनता दरबार नियमितपणे आयोजित करून कार्यकर्ते व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी यावेळी दिली.

Total Visitor Counter

3301032
Share This Article