GRAMIN SEARCH BANNER

व्हिएतनामच्या महासागरात चिपळूणच्या सावर्डेकर कन्येचा डंका; शिवप्रेमाच्या जयघोषाने दुमदुमला सातसमुद्र

Gramin Varta
135 Views

चिपळूण :छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा जाज्वल्य वारसा जिजाऊंच्या लेकींनी सातासमुद्रापार नेला असून व्हिएतनाममधील ‘हा लाँग बे’ येथील विशाल महासागरात आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आयोजित तिसरे आंतरराष्ट्रीय महाअधिवेशन आणि शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. या जागतिक सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्षा अनुजा राजे भोसले यांनी केलेले नेटके नियोजन आणि प्रभावी सूत्रसंचालन हे या संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरले. सातासमुद्रापार एका भव्य क्रूझवर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय उद्योगपती डॉ. संजय वायाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी अधिवेशनाच्या अध्यक्षा प्रा. मयुरा देशमुख यांनी महिलांच्या डिजिटल प्रगतीवर आणि उद्योग क्षेत्रातील संधींवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या सोहळ्याला व्हिएतनाम चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक ह्युन तुये आणि सोफिया यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात वनिता अरबट यांच्या प्रास्ताविकाने झाली, तर टोकियो (जपान) येथील सपना गायकवाड यांनी दिलेल्या शिवगर्जनेने संपूर्ण महासागर परिसरात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. या जागतिक व्यासपीठावर शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डेचे प्राचार्य मंगेश भोसले यांचा विशेष गौरव करण्यात आला, ही बाब कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची ठरली आहे. कतार देशाच्या राष्ट्रीय अध्यक्षा स्वाती पाटील यांनी जागतिक स्तरावरील संघटना बांधणीवर आपले विचार मांडले. या भव्य नियोजनासाठी सुलभा कुंवर, दिपाली चौरे, वैशाली वायाळ, सुनंदा खैरनार यांच्यासह अनेक मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले. प्रसिद्धी प्रमुख संयुक्ता देशमुख यांनी तयार केलेल्या चित्रफितीचेही यावेळी कौतुक झाले. वैष्णवी जाधव, सुहानी आणि रेणुका हेरूळकर या तरुण पिढीच्या सहभागाने या सोहळ्याची रंगत अधिकच वाढली. सातासमुद्रापार मराठी बाणा जपणारा हा सोहळा जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Total Visitor Counter

3369672
Share This Article