GRAMIN SEARCH BANNER

मोबाईल नंबरप्रमाणे बदलता येणार गॅस कंपनी! LPG पोर्टेबिलिटीचा तुम्हाला कसा होणार फायदा?

Gramin Varta
11 Views

नवी दिल्ली: एलपीजी पोर्टेबिलिटीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता तुम्हाला मोबाईल नंबरप्रमाणेच तुमच्या घरात वापरल्या जाणाऱ्या एसपीजी गॅस सिलिंडरची कंपनी देखील बदलता येणार आहे.

तुम्हाला तुमच्या एलपीजी पुरवठादाराच्या सेवेबद्दल त्रास होत असेल, गॅस कंपनी किंवा डीलर तुम्हाला चांगली सेवा देत नसेल तर तुमच्यासाठी ही सेवा अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

मोबाईल नंबर पोर्ट करण्याप्रमाणेच आता तुमच्याकडे नवीन खरेदी न करता तुमची एलपीजी कनेक्शन कंपनी बदलण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (पीएनजीआरबी) ‘एलपीजी पोर्टेबिलिटी’ नावाच्या एका नवीन योजनेवर काम करत आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यानंतर ग्राहकांना आपल्या कंपनीऐवजी दुसऱ्या कंपनीकडून गॅस सिलिंडर ऑर्डर करता येणार आहेत.

चांगली सेवा देणारी कंपनी निवडता येणार

तुम्ही तुमचा मोबाईल नंबर न बदलता जसे एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाता तसेच तुम्हाला ही सेवा सुरू झाल्यानंतर तुमचे एलपीजी कनेक्शन एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर करता येणार आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीप्रमाणेच स्वयंपाकाच्या गॅस ग्राहकांना लवकरच त्यांचे सध्याचे कनेक्शन न बदलता पुरवठादार बदलण्याची परवानगी दिली जाईल. यामुळे ग्राहकांना चांगली सेवा देणारी कंपनी निवडता येणार आहे.

एलपीजी कंपनी किंवा डीलर निवडण्याचे स्वातंत्र्य

तेल नियामक पीएनजीआरबीने ‘एलपीजी इंटरऑपरेबिलिटी’ मसुद्यावर भागधारक आणि ग्राहकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. यासंदर्भात पीएनजीआरबीने एका सूचनेत म्हटले की स्थानिक वितरकाला ऑपरेशनल अडचणींचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत ग्राहकांनाकडे मर्यादित पर्याय असतात आणि त्यांना सेवेत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ग्राहकांना एलपीजी कंपनी किंवा डीलर निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.

सध्या गॅस कंपनी बदलणे शक्य नाही?

ऑक्टोबर 2013 मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने 13 राज्यांमधील 24 जिल्ह्यांमध्ये एलपीजी कनेक्शनची पायलट पोर्टेबिलिटी सुरू केली होती. जानेवारी 2014 मध्ये ती भारतातील 480 जिल्ह्यांमध्ये वाढवण्यात आली. परंतु त्यावेळी ग्राहकांना त्यांचा डीलर बदलण्यासाठी मर्यादित पर्याय देण्यात आले होते, परंतु कंपनी बदलण्याचा कोणताही पर्याय नव्हता. कारण कंपनीचे एलपीजी सिलिंडर रिफिलसाठी फक्त त्याच कंपनीकडे सादर करणे आवश्यक होते. आता पीएनजीआरबी आंतर-कंपनी पोर्टेबिलिटीला परवानगी देण्याची तयारी करत आहे.

आंतर-कंपनी पोर्टेबिलिटीला परवानगी मिळणार?

पीएनजीआरबी आता आंतर-कंपनी पोर्टेबिलिटीला परवानगी देण्याचा विचार करत आहे. नियामकाने म्हटले की, “पीएनजीआरबी एलपीजी पुरवठ्यातील सातत्य मजबूत करण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास जपण्यासाठीच्या उपाययोजनांवर ग्राहक, वितरक, नागरी समाज संघटना आणि इतर भागधारकांकडून मते आणि सूचना मागवत आहे. सूचना प्राप्त झाल्यानंतर पीएनजीआरबी एलपीजी पोर्टेबिलिटीसाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल आणि देशभरात त्याची अंमलबजावणी करण्याची तारीख ठरवेल.”

या सेवेचा ग्राहकांना कसा होणार फायदा?

अनेकदा ग्रामीण भागात किंवा शहरातही अनेक गॅस डीलर्स वेळेवर सिलिंडर देत नाहीत किंवा खराब सेवा देतात. अनेकदा सिलिंडरसाठी दोन तीन दिवस वाट पाहावी लागते. अशा परिस्थितीत ग्राहकांकडे दुसरा पर्याय नसतो. परंतु नवीन प्रणाली ग्राहकांना इंडेन, भारत गॅस किंवा एचपी गॅस यापैकी कोणत्या कंपनीची सेवा हवी हे निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देणार आहे. यामुळे तुमच्या भागात ज्या कंपनीची आणि डीलरची सेवा चांगली आहे, तो पर्याय तुम्हाला निवडता येणार आहे. म्हणजे आता फक्त गॅस सिलिंडरच नाही तर कंपनीही तुमच्या इच्छेनुसार चालतील आणि सेवा देताना ग्राहकांचा विचार सर्वात आधी करतील. तसेच गॅस कंपन्यांच्या सेवेची गुणवत्ता देखील सुधारेल.

तुम्हीही नोंदवू शकता तुमचं मत

पीएनजीआरबीने या विषयावर जनता, गॅस वितरक आणि संघटनांकडून सूचना मागवल्या आहेत. सूचना अंतिम झाल्यानंतर, गॅस कंपन्या बदलण्याचे नियम तयार केले जातील आणि देशभरात त्यांची अंमलबजावणी केली जाईल. तुम्हालाही या प्रणालीवर तुमचे मत नोंदवायचे असेल किंवा काही सूचना करायची असेल तर तुम्ही PNGRB वेबसाइटला भेट देऊन तुमच्या सूचना पाठवू शकता.

Total Visitor Counter

2645583
Share This Article