GRAMIN SEARCH BANNER

सेवा पर्व 2025 : भाट्ये समुद्र किनारा स्वच्छता मोहीम

Gramin Varta
175 Views

परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाला हातभार लावा- जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी : सेवा पर्व 2025 अंतर्गत जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस विभाग, नगरपरिषद, ग्रामपंचायत भाट्ये, फिनोलेक्स, गद्रे मरीन, पटवर्धन हायस्कूल, रा. भा. शिर्के प्रशाला स्काऊट विद्यार्थी आदींच्या संयुक्त विद्यमाने भाट्ये समुद्र किनाऱ्याची आज स्वच्छता करण्यात आली. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेऊन पर्यावरणाला हातभार लावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.

भाट्ये येथील समुद्र किनारा आज स्वच्छ करण्यात आला. यावेळी केंद्रीय वन व वातावरणीय बदल विभाग मंत्रालयाचे अवर सचिव सत्यप्रकाश, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी उत्तम माने, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसिलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, मुख्याधिकारी वैभव गारवे, सरपंच प्रीती भाटकर,  फिनोलेक्सचे नरेश खरे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, आज आपण युट्युब वर पाहिलं तर एक नवी समस्या दिसत आहे. समुद्र तळाशी असणारे जीव वर येत आहेत. त्याचे कारण म्हणजे प्रदूषण होय. समुद्र, नदी, जलस्त्रोत या सर्व ठिकाणी आज आपण प्रदूषण करतोय. त्याची स्वच्छता करणे, हे प्रदूषण रोखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता स्वत:पासून, आपल्या घरापासून करावी. 

एकच ध्यास ठेवू या प्लॅस्टीक पिशवी हटवू या

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून ‘एकल प्लॉस्टिक वापरु नका, एकच ध्यास ठेवू या प्लॉस्टिक पिशवी हटवू, समृध्द पर्यावरणाचे रक्षण करु या. वापर टाळू या प्लॉस्टिकचा जागर करु या’ पर्यावरणाचा असा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचे प्रकाशन आणि वितरण यावेळी करण्यात आले. पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी यावेळी पथनाट्ये सादर करुन पर्यावरण राखण्याचा संदेश दिला.

मी माझा समुद्रकिनारा वाचवत आहे

‘मी मान्य करतो की, स्वच्छ आणि निरोगी महासागर हा पृथ्वीवरील जीवनासाठी अत्यावश्यक आहे. मी मान्य करतो की, महासागराचे प्रदूषण व कचऱ्यापासून संरक्षण केले गेले पाहिजे. मी मान्य करतो की, माझे वर्तन पर्यावरणावर परिणाम घडवते. मी मान्य करतो की, माझ्याकडे योग्य निवड करण्याची शक्ती आहे. मी मान्य करतो की, माझे प्रयत्न निश्चितच बदल घडवू शकतात. मी शपथ पूर्वक प्रतिज्ञा करतो की, समुद्रकिनाऱ्यावर कोणताही कचरा न टाकता अस्तित्वातील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ ठेवीन. मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की, समुद्री जीवसृष्टीवर प्लास्टिकच्या अपायकारक परिणामांविषयी जनजागृती करेल. मी शपथ पूर्वक प्रतिज्ञा करतो की, पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचा प्रयत्न करीन. एक पेड मा के नाम प्लांट फॉर मदर अभियानांतर्गत मी माझ्या मातोश्रींच्या नावाने व धरणी मातेच्या सन्मानार्थ एक वृक्षारोपण करीन मी शपथ पूर्व प्रतिज्ञा करतो की, पर्यावरण पूरक व शाश्वत जीवनशैलीचा सराव व प्रसार करून मातृभूमीची रक्षा करण्यात हातभार लाविन मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की निसर्गाशी सुसंवादी जीवन जगेन.’

अशी स्वच्छतेची शपथ सर्वांनी घेतली. यावेळी  नारळाचे वृक्षारोपण करण्यात आले. प्र.जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा कोषाधिकारी प्रविंद बिराजदार आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस जवान आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

2646735
Share This Article