रत्नागिरी : तालुक्यातील मोहितेवाडी, पाली येथे सासरच्या लोकांचा विश्वास संपादन करून सुनेनेच घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना १० जुलै रोजी दुपारी ११.५० वाजताच्या सुमारास घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत दत्ताराम राजाराम मोहिते (वय ५९, रा. मोहितेवाडी पाली, ता. जि. रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २८ जून २०२५ रोजी त्यांच्या मुलाशी लग्न झालेल्या सूनबाईने सुरुवातीला कुटुंबातील सर्वांचा विश्वास जिंकला. मात्र, १० जुलै रोजी दुपारी ११.५० वाजताच्या सुमारास तिने त्यांच्या राहत्या घरातील बेडरूममधील लोखंडी कॉटखाली ठेवलेली कुलूपबंद पेटी उघडली. त्या पेटीतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन ती पसार झाली.
चोरीस गेलेल्या मालामध्ये एकूण ३,६२,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ६०,०००/- रुपये रोख रक्कम असा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
पाली येथे नवविवाहिता साडेतीन लाखांच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन फरार
