रत्नागिरी : शहरातील कासारवेली परिसरात किरकोळ कारणावरून दोन तरुणांनी एका तरुणाला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना १३ जुलै २०२५ रोजी रात्री ११.३० वाजता घडली. या घटनेत गौरव संतोष शिंदे (वय ३२, रा. गाडीतळ, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत. सिद्धार्थ विठ्ठल लाकडे (रा. कासारवेली), अक्षय माने (पूर्ण नाव माहीत नाही, रा. गवळीवाडा) या दोघांवर खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गौरव शिंदे हे त्यांच्या सासरवाडीला कासारवेली येथे मेव्हणा भूषण शिरगांवकर यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर घराबाहेर ते सिगारेट ओढत उभे असताना आरोपी अक्षय माने याने त्यांच्याकडे येऊन “तु इथे का उभा आहेस, बाजूला हो” असे म्हणून वाद घातला. गौरव यांनी आपण सिगारेट ओढत असल्याचे सांगितल्यावर आरोपीने संतापून त्यांना शिवीगाळ करत हाताचा थापटा मारला. दरम्यान, त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या आरोपी सिद्धार्थ विठ्ठल लाकडे (रा. कासारवेली) यानेही गौरव यांना मारहाण केली. त्यानंतर त्याच्या हातातील लोखंडी सळीने गौरव यांच्या डोक्यावर जोरात वार केला. यामुळे गौरव शिंदे गंभीर जखमी झाले. शिवाय “मी तुला बघून घेईन” अशी धमकी देत दोघे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
याप्रकरणी १४ जुलै रोजी सकाळी ११.०४ वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.
रत्नागिरी: कासारवेली येथे तरुणावर लोखंडी सळीने डोक्यात हल्ला
