GRAMIN SEARCH BANNER

कांदळवन क्षेत्राला पर्यटन केंद्र करणार – वनमंत्री गणेश नाईक

Gramin Varta
16 Views

नवी मुंबई: महाराष्ट्राला विस्तीर्ण कांदळवन क्षेत्र लाभले असून या कांदळवन क्षेत्राला पर्यटन केंद्र करणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी नवीमुंबईत बोलताना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रामध्ये वन विभागातर्फे एक दिवसीय वनोपज आधारित उद्योग निर्मिती उपक्रमांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन वनमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रामध्ये वन विभागातर्फे एक दिवसीय वनोपज आधारित उद्योग निर्मिती उपक्रमांचे प्रदर्शन आयोजित केले होते. वनसंपदा आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पादनांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता. प्रदर्शनात वनौषधी, हस्तकला, शेतीपूरक उत्पादने, तसेच वनसंवर्धन आणि रोजगार निर्मितीशी संबंधित माहिती देण्यात आली.

तसेच वनोपज उत्पादने, महाराष्ट्रातील कांदळवनांची माहिती, व्याघ्र प्रकल्प, कांदळवन संवर्धन, प्रस्तावित कांदळवन इत्यादींची माहिती देणारे स्टॉल देखील या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, सह्याद्री, पेंच, ताडोबा व्याघ्र प्रकल्प, बांबू डेव्हलपमेंट बोर्ड वनविभागाच्या आणि अन्य खात्यांनी यात सहभाग घेतला होता. या प्रदर्शनाचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नाईक यांनी सर्व स्टॉल्सना भेट दिली. या उपक्रमांमुळे वनसंवर्धन आणि वनोपजांना बाजारपेठ मिळवून देण्याला बळ मिळेल, असा विश्वास यावेळी वनमंत्री नाईक यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राला मोठ्याप्रमाणात कांदळवन क्षेत्र लाभले आहे. त्यामुळे या क्षेत्राला पर्यटन केंद्र बनविणार असल्याची माहिती गणेश नाईक यांनी यावेळी दिली. गुजरात बॉर्डर पासून ते अगदी गोवा बॉर्डर पर्यंत तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर कांदळवने आहेत. या कांदळवन क्षेत्राला पर्यटन केंद्र करण्यासाठी त्याचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी ३४ प्रकारची कांदळवनाची झाडे लावली जातील. त्याठिकाणी पर्यटकांना सोयीसुविधा पुरविण्यात येतील, असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी मांडले. वनविभागाच्या वतीने वनीकरण सुरूच आहे. यासोबतच जन सहभागातून वनीकरण वाढविणार असून वनराजीचे जतन, संवर्धन आणि संगोपन करण्यात येईल, असेही नाईक म्हणाले.

Total Visitor Counter

2648143
Share This Article