कडवई /मुजीब खान :कडवई परिसरात बिबट्याचा वावर कमालीचा वाढला असून, शनिवार (२७ सप्टेंबर २०२५) रोजी पहाटे ४:०३ वाजता भोंबलवाडी परिसरात ही घटना दुसऱ्यांदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बिबट्या थेट मानवी वस्तीत निर्धास्तपणे फिरत असल्याचे स्पष्ट दिसून आल्याने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावून कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भोंबलवाडीतील रहिवासी इम्रान खान यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा धक्कादायक प्रकार कैद झाला. पहाटेच्या वेळी, जेव्हा घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत होते, तेव्हा एक बिबट्या रस्त्यावरून अगदी पाळीव प्राण्यासारखा शांतपणे आणि निर्धास्तपणे फिरताना दिसला. फुटेजमध्ये तो रस्त्यावरून जाताना स्पष्टपणे दिसत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात कैद होण्याची ही दुसरी घटना आहे. यामुळे मानवी वस्तीत बिबट्यांची हालचाल गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि गावकऱ्यांच्या अंदाजानुसार, गेल्या काही वर्षांपासून कडवई आणि आसपासच्या परिसरातील जंगलांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात झाला आहे. याच कारणामुळे भक्ष्याच्या (जनावरांच्या) शोधात हे हिंस्त्र प्राणी थेट गावाकडे वळत आहेत. परिणामी, पाळीव जनावरे आणि गावकऱ्यांच्या सुरक्षिततेवर मोठे संकट निर्माण झाले आहे.
बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. शेतीत काम करणे, रात्री घराबाहेर पडणे किंवा लहान मुलांना बाहेर खेळायला सोडणेही आता धोकादायक बनले आहे. त्यामुळे, गावकऱ्यांनी तातडीने एकत्र येत वनविभागाकडे पिंजरा लावण्याची तसेच बिबट्याला पकडून त्याला सुरक्षित स्थळी हलवण्याची जोरदार मागणी केली आहे. या मागणीवर वनविभाग तातडीने काय पाऊल उचलतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.